जागृत भय - भाग 1

 



कोमल, वय २६ वर्षे, एका लहानशा शहरातून आली होती.  मध्यमवर्गीय घर, मर्यादित साधनं, आणि स्वप्नांना सतत चिमटे काढणारी वास्तवाची टोचणी हे सगळं तिच्या बालपणापासून तिच्या सोबतीला होतं.आई-वडीलांवर आणि लहान भाव-बहिणीवरची काळजी घेणं तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. म्हणूनच, कोमल नेहमी स्वतःला प्रेरित करत असे“घराला आधार द्यायचा असेल, घरच्यांची परिस्थिती सुधारायची असेल, तर मला कष्ट करावेच लागतील.”

खूप मोठी स्वप्नं मनाशी बाळगून ती पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात आली. इथे येणं म्हणजे तिच्यासाठी फक्त नोकरी मिळवणं नव्हतं तर घरच्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणण्याची ही शेवटची वचनबद्ध धडपड होती. पुण्याच्या गर्दीतून चालताना तिच्या पावलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असायचा. जणू ती स्वतःला नव्याने सिद्ध करायला निघाली होती.बघता बघता तिने नोकरी मिळवली आणि आज तिला ही नोकरी करत पाच वर्षे झाली आहेत . काम तिच्यासाठी फक्त जबाबदारी नव्हतं ते तिचं शस्त्र होतं, तिची ताकद, आणि तिच्या स्वप्नांच्या लढाईतील सर्वात मोठा साथीदार. थकवा तिचा पाठलाग करायचा, अडचणी तिचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करायच्या, कधी परिस्थिती तिच्या मनोधैर्याला हादरे द्यायची… पण कोमल कधीच पाय मागे घेत नव्हती.तिच्यासाठी *सुट्टी* हा एक परका शब्द होता आणि *थांबणे* ही तर तिच्या स्वभावातच नव्हती.कोमलची ही जिद्द, मेहनत आणि ध्येयदृष्टी तिच्या व्यक्तिमत्वात चमकत असे,  प्रत्येक दिवशी ती स्वतःच्या कर्तृत्वाच्या नव्या उंचीला गाठण्याचा प्रयत्न करत असे, आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई ही फक्त स्वतःसाठी नव्हे, तर कुटुंबासाठी ही होती.


कोमलचं आयुष्य नव्या गतीने धावायला लागलं. सुरुवातीला ती तिच्या मित्रिणीसोबत राहत होती—एकमेकांच्या गप्पा, हसणं, छोट्या-छोट्या तक्रारी… या सगळ्यामुळे कामाचा ताण थोडा हलका वाटायचा. पण त्या मित्रिणीचं लग्न झालं आणि कोमल अचानक एकटी पडली. स्वःताचा फ्लॅट भाड्याने घ्यावा लागला, खर्च वाढला, आणि सगळ्यात तीव्र जाणवायला लागलं—ओसरीवरचा तो निःशब्द एकटेपणा.

रात्रभराचा अंधार तिच्या खिडकीतून आत सरकत असे, आणि खोलीतल्या शांततेत तिचंच श्वासोच्छ्वास जड वाटू लागायचं. कधी भीती, कधी पोकळी, कधी फक्त एक अज्ञात गडद भावना—हळूहळू तिच्या भोवती सावल्यांसारख्या जमा व्हायच्या. काही दिवस त्या सावल्या शांतपणे तिच्या मनाभोवती फिरायच्या, तर कधी जोरात आत शिरून तिच्या मनाला झटका द्यायच्या.
पण कोमल—ती लढवय्यी होती.
ती स्वतःला ठाम सांगत असे,
“मी का एकटी आहे यापेक्षा महत्त्वाचं आहे—मी का इथे आहे.”

तिचं IT मधलं काम गेल्या पाच वर्षांपासून असंच धगधगत होतं—Production issues, tight deadlines, ऑन-कॉल पेजर्स, सतत वाजणारे मेल्स, आणि न संपणारे स्प्रिंट रिव्ह्यूज. दिवस १०–१२ तासांच्या कामात संपून जात असे. ऑफिसमधून कधी उशिरा बाहेर पडायचं, तर घरी पोचल्यावरही US calls तिला रात्री १–२ वाजेपर्यंत संगणकासमोर बांधून ठेवायचे.
झोपेचं वेळापत्रक कुठेतरी हरवलं होतं, आणि तिच्या आयुष्याचा ताल तुटायला लागला होता.

प्रोजेक्ट इतका demanding होता की प्रत्येक task एक पर्वत वाटायचा.
आज एक issue resolve केला की उद्या दोन नवीन उभे राहत असत जणू थकव्यावर थरावर थर साठत गेले.

हळूहळू तिच्या शरीराने सिग्नल द्यायला सुरुवात केली 
डोळ्यांखाली खोल काळी वर्तुळे,
हातांचा हलका कंप,
मानेला येणारी कडक वेदना,
आणि मनात सतत धावणारे विचार.

पण तरीही, कोमल स्वतःला थांबू देत नव्हती.
लॅपटॉपच्या निळ्या प्रकाशात तिची थकलेली नजर अडकलेली असताना, ती स्वतःलाच हलक्या आवाजात म्हणत असे

थोडं अजून काम करेन… मग आराम.
थोडं अजून सहन करेन… मग शांतता.”

पण तिला अजून कळलंच नव्हतं—
की “थोडं अजून” कधीच संपत नव्हतं.

पण तो आरामाचा दिवस कधीच येत नसतो; जसा सूर्य उगवतो, तसाच तो कामाचा दबाव आणि जबाबदारी सतत वाढवत असे. कोमलच्या मनात घरच्यांची चिंता, कामाचा ताण आणि एकटेपणाचा गडद छाया यांचा संगम रोज होतो. त्यामुळे तिच्या आयुष्यात सतत थरार, अस्वस्थता आणि हलक्या दुःखाचा गुंता वाढत जात असे.

रात्री, फ्लॅटच्या शांततेत, कोमलच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडू लागली, हात थरथरू लागले, पण ती स्वतःलाच समजावत होती:

“थोडं अजून काम करेन… मग आराम.”

पण त्या रात्रीचं वातावरण… अगदी वेगळंच होतं.
जणू हवा स्वतःच तिच्या भोवती गोठली होती.

ती लॅपटॉपसमोर कोडमध्ये हरवून बसली होती, डोळ्यांत थकव्याची जळजळ, डोक्यात US कॉलची काळजी, आणि त्या खोलीच्या शांततेत तिच्या कीबोर्डच्या टकटक शिवाय काहीही नव्हतं.

आणि अचानक एक विचित्र, पोकळ हलचल.

जणू कोणीतरी खोलीत फिरत आहे.
जाणवत होतं… पण दिसत नव्हतं.

कोमलने पहिल्यांदा स्वतःलाच समजावलं, आवाज खाली आणत “थकवा असेल… hallucination. मी खूप जागी आहे.”

पण तो आवाज तो हलका, ओलसरसा पावलांचा स्पर्श
तो दूर न जाता जवळ येत होता.
जवळ… अजून जवळ…

तिच्या मणक्यातून एक थंड झिणझिणीची लाट गेली.
तिने सावधपणे खुर्चीवरून मागे मान वळवली 

काहीच नव्हतं.
फक्त अंधार.
आणि त्या अंधारातून येणारी एक गाठ बांधून ठेवणारी शांतता.

स्क्रीनचा निळसर प्रकाश तिच्या चेहऱ्यावर हलकेच चमकत होता, पण खोलीच्या कोपऱ्यांमध्ये सावल्या जाड, जड झाल्यासारख्या उभ्या होत्या जणू त्या तिच्याकडे नजर रोखूनच पाहत होत्या.

कोमलने पुन्हा काम सुरू केलं…

पण हृदयाचा ठोका वाढत होता, ओठ सुकत होते.
कोडच्या ओळी स्क्रीनवर धावत होत्या पण तिच्या मनात मात्र एकच वाक्य धावत होतं

“कोणीतरी इथे आहे.”

तेव्हाच भिंतीच्या उजव्या कोपऱ्यातून हलकासा सावट हललं.
धूसर ,अस्पष्ट ,पण अगदी खऱ्यासारखं.

जणू कोणीतरी तिच्या मागे उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत होता…
आणि मग तिच्या अगदी शेजारून शांतपणे सरकत तिच्या दुसऱ्या बाजूला गेला.

तिने घाबरून डोळे मोठे केले. कोणीच नाही.पण तिला जाणवलं हवा हलली होती.
जागा रिकामी नव्हती.तिच्या त्वचेवर पावसाळी रात्रीसारखी थंड ओल आली.

तिच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण शांतता पसरली…
पण त्या शांततेतदेखील काहीतरी फिरत होतं.
काहीतरी भटकत.
काहीतरी जड, ओळख न पटणारे.

तिचा मेंदू थकव्याने डळमळत होता, पण हा अनुभव थकव्यापेक्षा वेगळा होता तो जिवंत होता.

कोमलच्या श्वासाचा वेग वाढला.
तिच्या हृदयात भितीचं ओझं दाटून आलं.

आणि तिला प्रथमच जाणवलं ही फक्त झोपेची कमतरता नाही,

हा भ्रम नाही…

अंधारात काहीतरी आहे.
हलतंय.
जागं आहे.
आणि ती एकटी नाही.


स्क्रीनसमोर बसलेली कोमल अजूनही कामाचा मुखवटा घालून बसली होती, पण तिच्या आत मात्र काहीतरी पूर्णपणे तुटत होतं. तिचा मेंदू थकव्याने धूसर झाला होता, आणि त्या धूसरपणातून विचित्र, अस्वस्थ करणाऱ्या चित्रछटा तिच्यासमोर तरंगू लागल्या जणू कामाच्या नोटिफिकेशन्सच आता भयावह सावल्यांच्या रूपात तिच्याभोवती घुटमळू लागल्या होत्या.

फ्लॅटमधली एकटी लाइट मंदपणे थरथरत होती, जणू तीही काहीतरी दडपणाखाली श्वास घेत होती. त्या थरथरत्या प्रकाशात सावल्या उंचावल्या, पसरल्या, आणि अचानक जिवंत होऊन हलल्यासारख्या वाटल्या. कोमल उठून उभी राहिली, मागे वळली खोली रिकामी.
मूक.
निःशब्द.
पण त्या शांततेतही काहीतरी हलण्याचा क्षीण कंपन तिच्या त्वचेवर जाणवत होता. जणू अंधार स्वतः तिच्याकडे सरकत होता.

तिने स्वतःला पुन्हा समजावत म्हटलं,
“फक्त थकवा आहे. मी नुसती घाबरतेय.”
पण त्या क्षणी एक अगदी हलकासा, अतिशय जवळचा फुसफुसण्याचा आवाज तिच्या कानाला स्पर्श करून गेला.

ती दचकली. तिच्या संपूर्ण शरीरात एकाच वेळी थरथर आणि गोठलेपणा पसरण्यास सुरुवात झाली. हातांचे कंप वाढले, पण तिचे डोळे स्क्रीनकडे खिळलेलेच राहिले, कारण स्क्रीनवरचा निळा प्रकाश हा एकमेव “जिवंत” आधार तिला वाटत होता.

पावलांचा आवाज…
तो आता स्पष्टपणे वाढत होता.
हलकासा घसराट, मग सौम्य धप्प—धप्प—
जणू खोलीतली जमीन कोणीतरी अनोळखी व्यक्ती सावधपणे टेहळत चालत आहे.

कोमलने घाईघाईने फोन उचलला, टॉर्च ऑन केली प्रकाशाने खोलीचा प्रत्येक कोपरा चिरला.
पण काहीच नव्हतं.
कुठेही नाही.

फक्त तिची स्वतःची सावली…
तिच्या भीतीने थरथरणाऱ्या हातांसोबत हलणारी, तुटक प्रकाशात लांबणीवर जाणारी.
ती सावलीही आता तिचं म्हणणं ऐकत नव्हती जणू तिचीदेखील भीती वाढली होती.

कोमल खोल श्वास घेत होती, पण तिच्या श्वासांचे आवाजही खोलीत घाबरटपणे परतत होते.
तेव्हाच अचानक.
अतिशय शांतपणे.

खिडकीच्या काठावर काहीतरी उभं होतं.

एक अस्पष्ट, धूसर रूप.
डोळे ओळखू न येणारे.
चेहरा आकारहीन.
पण ते तिला पाहत होतं.

कोमल स्तब्ध झाली.
हृदयाचा ठोका क्षणभर थांबल्यासारखा झाला.

तो आकृतीमय आकार कधी दिसत होता, तर कधी हवेत विरघळून अदृश्य.
प्रकाश झटकल्याने कधी त्याचं रूप पातळ होत होतं, तर कधी घन, काळ्या धक्क्यासारखं दाट होत होतं.

तिच्या मनात एक भयंकर शंका उमटली एक विचार जो तिच्या कल्पनेपलीकडचा होता

“मी खरंच एकटी आहे का?
की कुणीतरी… किंवा काहीतरी… माझ्यासोबत इथेच आहे?”

त्या प्रश्नाने तिच्या पोटात थंड दगडासारखं काहीतरी बसलं.
आणि खोलीचा अंधार…
अजून खोल, अजून जिवंत झाला.

त्या रात्रीचा अंधार फक्त रात्रीचा नव्हता तो तिच्या मनात, तिच्या खोलीत, तिच्या सावल्यांमध्ये जाऊन बसला होता.
कोमलला आता पुन्हा-पुन्हा जाणवत होतं—ही फक्त दमणूक नाही, ही फक्त ताणाची खेळती छाया नाही.
काहीतरी आहे. काहीतरी जिवंत.
आणि ते दिसत नसताना सुद्धा भासत होतं.

खोलीतील प्रत्येक वस्तू—तिचे कागद, लॅपटॉपची स्क्रीन, टेबलाचा कोपरा, फ्रीजचं दार सगळं काही जणू अंधाराच्या नजरेखाली उभं होतं.
एक अशा नजरेखाली, जी समोर न येता फक्त पाहत राहते.

कोमलने खोल श्वास घेतला.
तिला माहित होतं, या रात्री झोप तर मिळणार नाहीच, पण कामाकडेही बघण्याची तिच्यात ताकद उरली नव्हती.

ती उठली—पूर्ण धडधडत्या हृदयाने, थरथरत्या पायांनी 
आणि तिने खोलीचे सगळे लाईट्स ऑन केले.
उजेड पसरला.
चारही भिंती, कोपरे, खिडकी, टेबल, दरवाजा सगळं यथास्थित दिसलं.

काहीच नव्हतं.
पण त्या "काहीच" च्या शांततेतही भिती दडून बसली होती.

तिने प्रत्येक कोपरा तपासला, पाण्याचा पाईप, पडद्यामागे, बेडखाली…
सगळीकडे रिकामेपणा.
पण तो रिकामेपणा स्वतःच आवाज करत होता जणू तिला हसत होता.

कोमलकडे आता परत बसून लॅपटॉप उघडण्याची हिम्मत नव्हती.
ती स्क्रीन अगदी तशीच चालू ठेवून बसली जणू निळसर प्रकाश तिला “एकटी नाहीस” असा आधार देत होता.

तिने थरथरत्या हातांनी YouTube उघडलं आणि हनुमान चालीसा चालू केली.
आवाज मंद, पण आश्वासक.
ती बेडवर पडली, चादर घट्ट धरून.

पण तिचं शरीर…
पूर्ण घामाने भिजलं होतं.
तिच्या मानेतून, केसांतून, कपाळावरून घामाची धार खाली ओघळून डोळ्यांवर येत होती.
तिच्या श्वासात थरथर, धडधड, आणि घाबरट हबकलेले थेंब मिसळले होते.

आणि मग अचानक.

तिच्या अगदी शेजारी, अगदी कानाजवळून
काहीतरी झट्कन हललं.
जणू कोणीतरी तिच्याकडे वाकून काही पकडायचा प्रयत्न केला.

कोमलने घाबरून डोळे घट्ट मिटले
इतक्या जोरात की तिचा चेहराच ताणला गेला.
थरथर तिच्या हातांतून पसरत पाठीपर्यंत गेली.

ती एवढी भीतीने दडपली होती की आता तिला स्वतःच्या हृदयाचे धडधडणारे तडतड आवाज स्पष्ट ऐकू येत होते.
जणू तिचं हृदयही पार घाबरून तिच्याच कानाशी म्हणत होतं
“इथं काहीतरी आहे…”

तिला कळत नव्हतं काय करावं.
कसा झोपावं.
कुठे तोंड करावं.
कुठे बघावं.

आणि खोलीच्या प्रकाशातही तिला जाणवत होतं
अंधार अजून संपलेला नव्हता.
तो फक्त… उभा राहून वाट पाहत होता.

कोमल बेडवर पडून होती. हनुमान चालीसा अजूनही लॅपटॉपवर मंद आवाजात वाजत होती

“भूत पिशाच्च निकट नाही आवे…”
पण त्या ओळी ऐकतानाही तिच्या मनात शांतता येण्याऐवजी उलट छातीत थंड रिकामेपणा दाटून येत होता.

खोलीतलं प्रकाशमान उजेड भिंतींवर स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होता, पण कोमलच्या नजरेला प्रत्येक सावली जिवंत भासत होती.
जणू कोणीतरी त्या उजेडाच्या काठावर उभं राहून तिला पाहत होतं
फार स्थिरपणे.
फार शांतपणे.

ती चादर चेहऱ्यापर्यंत ओढून घेतली.
डोळे घट्ट मिटले.
पण अंधार डोळे मिटल्यावरही संपत नव्हता
तो तिच्या डोक्यात उतरला होता.

तिच्या कानात हनुमान चालीसाचे शब्द तरंगत होते, पण त्याचबरोबर एक अतिशय हलका आवाज
जणू कोणी श्वास घेत आहे…
जणू कोणीतरी तिच्या खांद्यावर उभं आहे…
जणू कोणीतरी तिच्या बेडभोवती हळूहळू फिरत आहे.

कोमलने पापणीही हलवली नाही.
पण तिचं हृदय धडधडत होतं इतकं जोरात, की ती स्वतःलाच ऐकू येत होतं.

तिच्या कल्पनेत एक काळी आकृती उभी राहिली
एक धूसर, चांदण्याच्या प्रकाशाच्या काठावर डोलणारी सावली.
जणू उंच, बारीक, हात लांबलेले…
आणि डोळे काळ्या पोकळीप्रमाणे खोल.

ती सावली खोलीच्या एका कोपऱ्यात उभी होती…
आणि काही क्षणांनी…
तिच्या मनातच का होईना, पाऊल टाकत तिच्याकडे येऊ लागली.

तिच्या श्वासात थिजलेपणा आला.
तिचं शरीर जड झालं.
जणू ती हलूच शकत नव्हती.

“हनुमानजी… कृपा करा…” ती मनातल्या मनात पुटपुटली.

पण तिच्या प्रार्थनेतच अचानक
बेडच्या मॅट्रेसमध्ये एक हलकासा ‘धस्स’ असा आवाज झाला.

जणू कोणीतरी तिच्या शेजारी बसलं.
तिने डोळे उघडले नाहीत.
खूप प्रयत्न करूनही नाही.
कारण उघडले तर तिला दिसेल… अशीच तिची खात्री झाली होती.

आवाज पुन्हा आला
एक हलका सुस्कारा.
जणू कोणीतरी खूप जवळून श्वास घेत आहे.
तिच्या कानाजवळ.
तिच्या गालाजवळ.

तिच्या शरीरावरचा घाम अधिकच ओघळू लागला.
पाठीवर एक थंड लकेर सरकली जणू नखांनी कोणीतरी हळूच स्पर्श केला.

हनुमान चालीसा त्या वेळेस जरा जोरातच वाजू लागली.
लॅपटॉपचा स्पीकर कदाचित वाढला असेल…
किंवा कदाचित आवाज तिला यापूर्वी ऐकू येत नव्हता, आता मात्र भीतीने ती प्रत्येक शब्द धरून बसली होती.

“नासहिं भूत पिशाच्च निकट…”

त्या शब्दांच्या नादात, अचानक तिच्या पायाला कोणीतरी स्पर्श केला.

कोमलने थरथर कापत पाय मुठीत घट्ट ओढून घेतले.
डोळे मिटून ती शक्य तितक्या लहान गोळ्यासारखी वळली.
पण तो स्पर्श…
तो कल्पना नव्हता.
तो होता.
स्पष्ट.
थंड.
आणि जाणवण्यासारखा जिवंत.

त्याच क्षणी लाइट्स किंचित मंदावले
फक्त एक सेकंदासाठी
पण त्या एक सेकंदात तिला जाणवलं…
कोणी तरी तिच्या बेडच्या पायाशी उभं आहे.

एक सावली.
ती सावली तिच्या डोळे न उघडलेल्या चेहऱ्यावरही भरकटत जाणवत होती.
जणू तिच्याच घामाचे थेंब गोठले.

तिच्या कानात हनुमान चालीसाचे शब्द आता तीरांसारखे धावत होते.
तिच्या हृदयाची धडधड त्या तालात मिसळून जणू एखाद्या ढोलासारखी वाजू लागली होती.

पण त्या आवाजांमध्येही तिला ऐकू येत होतं

कुणाचं हलकं चालणं…
कुणाचं शांत उभं राहणं…
कुणाची सावली हालणं…

आणि तिला जाणवलं

ती एकटी नाही.
ती अजिबात नाही.

कोमलची श्वासे खूपच जड झाली होती. हनुमान चालीसाचे शब्द तिच्या कानात गुंजत होते, पण त्या आवाजासोबतच खोलीत कुठेतरी हलके पावलांचे टप्पे अजूनही ऐकत होते. जणू प्रत्येक टप्पा तिच्या हृदयावर प्रहार करत होता, प्रत्येक हलकासा घसराट तिच्या पायांना थरथर देत होता.

ती डोळे घट्ट मिटून बसली होती, चादर आपल्या अंगावर ओढलेली, शरीर थंड आणि जड वाटत होते. तिच्या मनात विचारांचा वादळ सुरू झाला “खरंच काही आहे का? मी एकटी आहे का?”
आणि मग तिच्या मनात आलेल्या भयानक कल्पनांनी तिला संपूर्ण झपाटले कोणीतरी तिच्या शेजारी उभे आहे, तिच्या केसांवर हात ठेवत आहे, तिच्या चेहऱ्यावर पाहत आहे, आणि ती काहीही करू शकत नाही.

हनुमान चालीसा ऐकताना ती हळूहळू मनात स्वतःला समजावू लागली.
"हनुमानजी शक्तिमान आहेत… काहीच घाबरायचं नाही. जे काही आहे ते दूर होईल…"
शब्दांची पुनरावृत्ती तिच्या भीतीवर थोडा आधार देत होती. तिच्या मनात हळूहळू भीतीत मिसळलेल्या कल्पना थोड्या शांत होत गेल्या.

ती डोळे मिटून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करू लागली. प्रत्येक श्वास हळूहळू खोलीतल्या अंधाराच्या दडपणाला दूर करत होता. हनुमान चालीसाचा मंत्र हळूहळू तिच्या कानात हलकासा गजर करत राहिला, जणू एक सुरक्षा कवच तयार होत आहे.

त्या सावल्यांच्या भयानक अंधारात ती हळूहळू स्वतःला सांगू लागली
"ही फक्त अंधार आहे… ही फक्त थकवा आहे… मी सुरक्षित आहे."

पावलांचा आवाज, हलकासा स्पर्श, आणि अंधारातील अस्पष्ट आकृती सगळे हळूहळू तिच्या मनाच्या काठावर सरकले. त्यांचा जोर कमी होऊ लागला. तिच्या हृदयाची धडधड हळूहळू मंदावू लागली.

कोमलने श्वासावर लक्ष ठेवत, चालीसा ऐकत, शरीर पूर्णपणे बेडवर झोपले.
थकवा, घाम, भीती सगळे हळूहळू तिच्या अंगातून निघून गेले. अंधार अजूनही खोलीत होता, पण आता तो घाबरणारा नव्हता. त्याला जणू तिच्या मनाने स्वीकारले होते.

तिच्या डोळ्यांवर झोपेचा गोड ओझ पडू लागला. ती हळूहळू सुसाट श्वास घेऊन, चालीसाचे शब्द कानात गुंजत राहिलेले, सुरक्षितपणे आणि शांतपणे झोपली.

अंधार, सावल्या, आवाज सगळे आता केवळ तिच्या स्वप्नांच्या दुनियेत मिसळून गेले. आणि त्या रात्री, कोमल अखेरीस शांत झोपेची ओढ घेतली.

Comments

Popular posts from this blog

शेवटचा फोन

मीच परत आलोय… पण मी नाही